पाथरूड : शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून भूम, परंडा तालुक्यातील पांढरीशुभ्र जूट ज्वारी आता पंजाबमध्ये पोहोचणार असून, यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून आर्थिक स्थैर्य येण्यास मदत होणार आहे.
भूम तालुक्यातील पाथरुडसह भूम आणि परांडा तालुका हा भाग ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. या भागात ज्वारी पिकास असणारे सर्व घटक जमिनीत उपलब्ध असल्याने व वातावरणही अत्यंत पोषक स्वरुपाचे असल्याने हिवाळ्यात ऑक्टोबर ते एप्रिल या चार महिन्यात हे पीक या भागात घेतले जाते. यंदा तर समाधानकारक पाऊस झाल्याने पाथरुडसह भूम, परंडा तालुक्यात जूट जातीच्या ज्वारीचे उत्पादन मोठ्या झाले आहे. परिसरातील शेतकरी ही ज्वारी बार्शी, जामखेड, खर्डा, सोलापूर, नगर येथील व्यापाऱ्यांना विकतात. त्यांच्याकडून या पांढऱ्या शुभ्र जूट ज्वारीस सुरुवातीस ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मात्र, त्यानंतर तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी निराश झाले.
दरम्यान, आता हीच ज्वारी येणाऱ्या काळात पंजाब येथील शेतकरी उत्पादक कंपनी खरेदी करणार आहे. आनंदवाडी येथील ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील या ज्वारीची खरेदी होणार असून, त्यामुळे या ज्वारीस प्रतिक्विंटल ४ ते ५ पाच हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळणार आहे. एकंदरीतच जूट या ज्वारीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लागणार आहे.
या भागात ज्वारीच्या अनेक जातीचे उत्पादन घेतले जाते. रब्बी हंगामात या भागात जूट, मालदांडी, सफेद गंगा, झिपरे अशा जातींची पेरणी होते. यात जूट या ज्वारीची गुणवत्ता अतिशय उत्तम असल्याचे तपासणीत समोर आले आहे. यामुळे या ज्वारीस अधिक मागणी असून, दरही चांगला मिळतो. यामुळे जूट ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात होते.
मातीची गुणवत्ता ठरत आहे वरदान
भूम, परंडा तालुका हा ज्वारीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. यासाठी येथील जमिनीचा पोत ज्वारी पिकास वरदान ठरत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून भूम तालुक्यातील मातीचा पोत तपासण्यासाठी काही नमुने नाशिकच्या चित्तेगाव फाटा येथील राष्ट्रीय संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले होते. यामध्ये नायट्रोजन (१.६१), प्रोटीन (१०.०६), फॉस्फरस (०.२३५८), पोटॅश (०.४४१०), कॅल्शियम (०.०७१५), मॅग्नेशियम (०.१७), सोडियम (०.०४२), सल्फर (०.०३), कॉपर (२३.१५), आयरन (७०.४०), मॅगनीज (१०.८५), झिंक (२५.७२) अशी मातीतील विविध खनिजांची वर्गवारी आहे. यामुळे ज्वारीची गुणवत्ता तर आहेच, शिवाय, या ज्वारीच्या कडब्याची उंची देखील १० ते १२ फुटांपर्यंत जाते. तसेच एकरी २५ क्विंटलपर्यंत जूट ज्वारीचे उत्पादन मिळत आहे.
पंजाब येथील कंपनीसोबत आमचे बोलणे झाले आहे. सध्या करार होण्याकडे वाटचाल चालू आहे. यावर्षी आपल्या भागातील ज्वारी बहुतांश शेतकऱ्यांनी विकली आहे. मात्र, पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे.
- सीताराम वणवे, संस्थापक, अध्यक्ष, ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी, आनंदवाडी