उस्मानाबाद/कळंब : कळंब तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी शिवारात तब्बल सव्वा कोटींचा गांजा सोमवारी रात्री पकडण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केल्याचे कळताच दोन आरोपीनी धूम ठोकली आहे.
मस्सा खंडेश्वरी शिवारातील एक शेतात गंजीमध्ये गांजा दडवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी या माहितीची खात्री केल्यानंतर सहायक निरीक्षक निलंगेकर, उपनिरीक्षक पांडुरंग माने, कर्मचारी जगदाळे, ठाकूर, घुगे, सय्यद, चव्हाण, जाधवर, ढगारे, मरलापल्ले, चौरे व माने असा मोठा फौजफाटा मस्सा शिवाराकडे रवाना झाला. मुद्देमाल जास्त किंमतीचा असल्याने आरोपीकडून प्रतिहल्ल्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या सूचनेप्रमाणे आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन या पथकाने शेतातील गंजीत लपवून ठेवलेल्या गांजावर रेड केली. तेव्हा तब्बल ४७ पोत्यांमध्ये बांधून ठेवलेला गांजा या पथकास आढळून आला. तो जप्त करून मोजदाद केली असता त्याचे वजन १ हजार १३२ किलो ६६ ग्रॅम इतके भरले. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे १ कोटी २४ लाख ५९ हजार २६० रुपये इतकी आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेने कारवाई केल्याचे कळताच आरोपी बालाजी छगन काळे व राजेंद्र उर्फ दादा छगन काळे (दोघेही रा. मस्सा) हे पसार झाले आहेत. याप्रकरणी कळंब ठाण्यात उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता आरोपींचा शोध घेत असून, हा गांजा नेमका कोठे पाठवला जाणार होता, याचाही तपास केला जाणार आहे.