उस्मानाबाद - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उस्मानाबादमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर तरुणाने चाकू हल्ला केला आहे. कळंब तालुक्यात प्रचारसभा सुरु असताना ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. नायगाव पाडोळी या गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी अजिंक्य टेकाळे याच्याविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
या हल्ल्यातून शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्याच बचावले आहेत. पोटावरचा वार हातावर झेलल्याने ओमराजे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. याबाबत बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, प्रचारासाठी मी नायगाव पाडोळी येथे गेलो असताना गर्दी जमली, या गर्दीतून तो तरुण माझ्याकडे आला. त्याने त्याचा एक हात माझ्या हातात मिळविला त्यानंतर दुसऱ्या हातात चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राहून मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला किरकोळ जखम झाली. मी सध्या सुखरुप आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर कळंब शहर बंद ठेवण्याचं आवाहन कळंब शिवसेनेकडून करण्यात आले होते. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, ओमराजे यांनी कळंब शहरात जाऊन व्यापाऱ्यांना आपली दुकानं उघडायला सांगितली, तसेच हा बंद मागे घेतल्याचंही सांगण्यात आलं.
तेरणा सहकारी साखर कारखान्याचे थकबाकी राहिली आहे यातून हा हल्ला झाला असावा असं बोललं जातं मात्र तेरणा साखर कारखान्याची थकबाकी राहिली नाही. सर्व पैसे दिलेले आहेत त्यामुळे ही माहिती चुकीची आहे. गेल्या २-३ सभेत असचं कोणाला तरी पाठवून सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत होता. यामागे कोण आहे याचा अंदाज आता बांधू शकत नाही. मात्र हल्लेखोर सध्या फरार आहे. याबाबत पोलीस तक्रार केली आहे. तपासानंतर या सगळ्यांचा पाठपुरावा करुन योग्य ती माहिती समोर येईल असं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.