उमरगा (जिल्हा. धाराशिव) : मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आरोळी ठोकत गाव तलावात उडी टाकून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर गावात महसूल, पोलिस प्रशासन दाखल झाले असून, ग्रामस्थांनी एकत्र जमून मोठी घोषणाबाजी केली.
माडज येथील किसन चंद्रकांत माने (३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शी व्यंकट गाडे व मयत तरुणाचे चुलते शिवाजी माने, ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार किसन माने हा तरुण मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी चर्चा करीत होता. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गाडे यांच्या दुकानासमोर बसून हीच चर्चा सुरू असताना किसन याने अंगावरील कपडे काढून मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे ओरडत गाव तलावाकडे धाव घेतली. क्षणार्धात त्याने पाण्यात उडी टाकली. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाळात फसल्याने बुडून मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर महसूल व पोलिस प्रशासन गावात दाखल झाले असून, ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जोरदार घोषणाबाजी केली. गावात दाखल झालेले महसूलचे अधिकारी राजाराम केलुरकर यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेत असल्याचे सांगितले.