लोकमत न्यूज नेटवर्क, धाराशिव : तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे मंदिरापर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे. जवळपास १२ ते १३ पुजारी सेवनात गुंतले असून, त्यांना चौकशीसाठी नोटिसा देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र, पुजारी मंडळांनी संतप्त भावना व्यक्त करीत हा समस्त पुजाऱ्यांच्या बदनामीचा प्रकार असल्याची भूमिका मांडली आहे. यावरून आता तुळजापूर वादविवादाचा आखाडा बनला आहे.
तुळजापूर, तामलवाडी येथील ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ३५ आरोपी निश्चित केले आहेत. यापैकी १४ आरोपी कोठडीत आहेत, तर २१ आरोपी फरार आहेत. या फरारींमध्ये माजी नगराध्यक्ष, नगरसेवकाचाही समावेश आहे. एकीकडे या फरारींचा शोध घेत असतानाच पोलिसांनी आरोपींशी सातत्याने असलेला संपर्क, आर्थिक व्यवहार केलेल्या अनेकांना संशयावरून चौकशीच्या नोटिसा दिल्या आहेत.
१२ ते १३ पुजाऱ्यांना नोटीसनोटीस दिलेल्यांमध्ये सुमारे १२ ते १३ जण मंदिरातील पुजारी असल्याची चर्चा तुळजापुरात आहे. या चर्चा सुरू होताच मंदिरातील पुजारी मंडळांनी एकत्र येत, हा पुजाऱ्यांच्या बदनामीचा कुटिल डाव असल्याचा आरोप केला आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले...जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार म्हणाले की, मंदिरातील कोणी यात सहभागी असेल व दोषी सिद्ध झाले तर विश्वस्त बैठकीत हा विषय मांडून कार्यवाहीचा विचार केला जाईल. दोष सिद्ध होण्यापूर्वी कार्यवाहीची घाई केली जाणार नाही.
पुजारी काय म्हणतात?ड्रग्स प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पुजारी मंडळांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यामध्ये दोषी असलेल्या प्रत्येकावर कायद्याने कारवाई जरूर करावी. मात्र, त्याआडून समस्त पुजाऱ्यांच्या बदनामीचा कुटिल डाव खेळू नये, अशी प्रतिक्रिया पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर कदम, प्रक्षाळ पुजारी मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांनी माध्यमांकडे व्यक्त केली.
पोलिसांचे म्हणणे काय?या प्रकरणाचा तपास सुरुवातीपासूनच आरोपी कोण आहेत, कोणाशी संबंधित आहेत, हे न पाहता पारदर्शकपणे करीत आहोत. ज्यांच्याविषयी सबळ पुरावे आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई करीत आहोत. मग ते पुजारी आहेत, नागरिक आहेत की अन्य कोणी, यावर आमचा फोकस नसल्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले.