तामलवाडी (जि. धाराशिव) : खडी वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पाेने दुचाकीला पाठीमागून जाेराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना साेलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सुरतगावनजीक मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. मयत व्यक्ती सांगवी (काटी) येथील रहिवासी आहे.
तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी येथील रहिवासी सैफन गुलाब शेख (४२) हे मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तामलवाडी येथून सांगवी (काटी) गावाकडे दुचाकीवरून (क्र. एमए १३-झेड ८९४२) निघाले हाेते. ते धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सुरतगावनजीक आले असता, खडी वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पाेने (क्र. एमएच २५-एके ७२७३) पाठीमागून जाेराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सैफन गुलाब शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकी समाेरच्या टायरखाली सापडून चक्काचूर झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तामलवाडी व नळदुर्ग हायवे पाेलिस घटनास्थळी दाखल हाेऊन पंचनामा केला. अपघाताची नाेंद तामलवाडी ठाण्यात करण्यात आली आहे. सैफन शेख यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुली, मुलगा असा परिवार आहे.