अणदूर : उस्मानाबाद जिल्ह्यात साखर कारखाने साेडले तर माेठ्या प्रमाणात बाराही महिने राेजगारनिर्मिती हाेईल, असा एकही कारखाना नाही. त्यामुळे या भागातील तरुणांना राेजगाराच्या शाेधात पुणे, मुंबई, औरंगाबाद ही शहरे गाठावी लागतात. असे असतानाच तुळजापूर तालुक्यातील आरबळी येथील माळरानावर जैविक इंधन व सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प साकारला जाणार आहे. अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून या प्रकल्पाच्या उभारणीची पायाभरणी करण्यात आली.
तुळजापूर तालुक्यातील आरबळी येथील कुसळी माळरानावर मीरा क्लिनफ्यल्स लि. या कंपनीने जैविक इंधन व सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प उभारणीसाठी सुमारे १८ एकर जमीन खरेदी केली हाेती. प्रकल्प उभारणीवर थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल साठ काेटी रुपये खर्च हाेणार आहेत. अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून धरणे बायोफ्युल कंपनीचे मालक सचिन धरणे यांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. साधारपणे २६ जानेवारी २०२२ पासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. दगड, माती, काचा, लाेखंड, पत्रा साेडून सर्व प्रकारच्या वस्तूंची खरेदी केली जाणार आहे. प्रतिदिन ५० ते १०० टन उत्पादन बाहेर पडणार आहे. या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेराेजगार तरुणांना राेजगाराची संधी मिळणार आहे. पायाभरणीच्या कार्यक्रमास नगरसेवक बसवराज धरणे, सेवानिवृत्त अभियंता सिद्धप्पा मुरमे, संचालक मुकुंद शिंदे, श्रीधर नरवडे, राहुल बेले, प्रतीक पाटील, डॉ. संतोष पवार, राम नवगिरे, प्रसाद गोगावे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
चाैकट...
आरबळी येथील प्रकल्पाच्या माध्यमातून पेट्राेल, डिझेलला पर्याय म्हणून जैविक इंधन, सेंद्रिय खतनिर्मिती केली जाणार आहे. एवढेच नाही तर घरगुती व वाहनांसाठीच्या गॅसचे उत्पादन करण्यात येणार आहे. गजरास गवत, कचरा आदी घटकांपासून इंधन तसेच गॅसनिर्मिती केली जाणार आहे. एवढेच नाही तर कंपनीच्या बेनिफीटमधील काही रक्कम खेड्यांसाठी विकास निधी म्हणून वापरण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे मालक सचिन धरणे यांनी दिली.