जाेरदार घाेषणाबाजी : आराेपामुळे गृह खात्याची प्रतिमा मलिन
उस्मानाबाद : मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा शंभर काेटी रुपये खंडणी वसूल करून देण्याचा आराेप केला आहे. या आराेपामुळे राज्याच्या गृह खात्याची बदनामी हाेत आहे. त्यामुळे देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा देऊन चाैकशीला सामाेरे जावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपच्या वतीने रविवारी जिल्हा कचेरीसमाेर निदर्शने करण्यात आली.
शंभर काेटी रुपये खंडणीच्या आराेपामुळे राज्याच्या पाेलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. असे असतानाही ज्यांच्यावर आराेप झाले ते गृहमंत्री अनिल देशमुख अद्यापही पदावर कायम आहेत. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असल्याने गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा देऊन चाैकशीला सामाेरे जावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘गृहमंत्री देशमुख हाय हाय, ठाकरे सरकार हाय हाय, महाविकास आघाडी सरकार हाय हाय’ यासारख्या घाेषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होती. यावेळी जिल्हाध्यक्ष काळे यांनी सरकारवर सडकून टीका केली. गृहमंत्री देशमुख यांचा केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांची चाैकशीही सुरू करावी. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चाैकशी करावी, अशी मागणी काळे यांनी यावेळी केली. आंदाेलनात भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, भाजयुमाेचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, सुजित साळुंके, बालाजी कोरे, प्रवीण पाठक, नामदेव नायकल, संतोष क्षीरसागर, गिरीश पानसरे, शीतल बेदमुथा, सुरज शेरकर, गणेश इंगळगी, प्रसाद मुंडे, अक्षय भालेराव, श्रीराम मुंबरे आदी उपस्थित हाेते.