उस्मानाबाद : पीक विमा, वीज तोडणी तसेच इतरही मुद्दे घेऊन भाजप आता आघाडी सरकारच्या विरोधात मैदानात उतरला आहे. जिल्हाभर बूथनिहाय बैठका घेऊन जनमानसात सरकारची निष्क्रियता पेरण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या बैठकांना शनिवारपासून सुरुवात करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी जवळपास ७५ ठिकाणी हा उप्रकम राबविण्यात आला.
संघटन आणखी मजबूत करतानाच या शक्तीकेंद्र बैठकीतून आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला जात आहे. आ. सुजितसिंह ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारपासून या बैठका सुरू झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत काजळा व उपळा येथून या उप्रकमास सुरुवात करण्यात आली. येथे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, जिल्ह्यातून ५८० कोटींचा पीक विमा भरला गेला असताना केवळ अटींचा बाऊ करीत ८० कोटींच भरपाई दिली. बाकीचे ५०० कोटी कोणाच्या घशात गेले. निसर्ग व कोरोनाने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. राज्यात महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या रोज घटना घडत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही सरकार गंभीर नाही. मराठा आरक्षणाविषयी व आता नव्यानेच समोर आलेल्या ओबीसी आरक्षणाविषयी आघाडी सरकार खंबीर भूमिका घेत नसल्याने समाजात अस्वस्थता पसरली आहे. या सरकारच्या बेफिकीर कारभाराला लोक वैतागले आहेत. त्यांना जागे करण्यासाठी बैठका घेऊन जागृती केली जात असल्याचेही काळे म्हणाले. हा उपक्रम २५ मार्चपर्यंत चालणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, प्रवीण पाठक, प्रवीण पाटील, नाना मडके, रामचंद्र कदम, मनोज कदम, सोमनाथ पवार, जगन्नाथ क्षीरसागर, प्रदीप शेळके, राहुल खोचरे, विकास राऊत, चंद्रकांत इंगळे, बप्पा पडवळ, बाबू पडवळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.