राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करत असंविधानिक पद्धतीने अदखलपात्र अशा गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली. एकीकडे राज्यात बलात्कार, खून, बेकायदेशीर वसुली यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून देखील सरकारमधील ख्यातनाम मंत्री मोकाट फिरत असताना केवळ राजकीय द्वेषापोटी राणे यांच्यावर खोटा गुन्हा नोंद करून अटक करण्यात आल्याचा आरोप करीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, बाजार समिती सभापती रामहारी शिंदे, अरुण चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पंडितराव टेकाळे, संजय पाटील, रोहीत कोमटवार, संतोष कस्पटे, माणिक बोंदर, संजय जाधवर, शहराध्यक्ष संदीप बाविकर, शिवाजी गिड्डे पाटील, शिवाजी आडसूळ, महादेव पावले, सचिन गंभिरे, मतीन पटेल, भगवान ओव्हाळ, शिवाजी शेंडगे, रामकिसन कोकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.