- बालाजी अडसूळ
कळंब (जि.उस्मानाबाद) : आजवर हातसडीचा ते इंद्रायणी असा तांदळाचा प्रवास अनुभवलेल्या आपल्या मातीत एकेकाळी ‘रॉयल फॅमिली’चा तांदूळ म्हणून ओळखला जाणारा ब्लॅक राईसही पिकविला जातो. यास कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील बळीराजांनी वास्तवात उतरवून दाखविले आहे.
जगभरातील भटारखान्यात तांदळाचा हमखास वापर केला जातो. यातही हातसडीच्या विविध गावरान जातीपासून आंबेमोहोर, इंद्रायणी, कोलम, चिन्नोर ते बासमती अशा अनेक शुभ्र रंगाच्या तांदळाचा स्वाद अन् आस्वाद सर्वांना परिचितच आहे. या स्थितीत काळ्या रंगाच्या तांदळाचा स्वाद अन् वाण या दोन्ही गोष्टी म्हणजे एक अप्रूपच होय, असा काळा तांदूळ असतो अन् तो आपल्या मातीत पिकतो, हे माळकरंजा येथे प्रायोगिक तत्त्वावर घेतलेल्या एका पीक प्रयोगातून समोर आले आहे. येथील महेश रघुनाथराव लोमटे पाटील यांनी आपल्या शेतात हॉर्टिकल्चरमध्ये डॉक्टरेक्ट असलेले स्नेही रणजित शिंदे (बाभळगाव, ता. बार्शी) यांच्या मदतीने कॅनडा येथे कार्यरत अग्रिकल्चरल प्रोफेसर डॉ. जयशंकर सुब्रह्मण्यम यांचे मार्गदर्शन घेत ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा प्रयोग फलश्रुतीस आणला आहे. या प्रयोगातून त्यांनी ताटातील अन्नपदार्थाची समृद्धी वाढीस लावतानाच आर्थिक सुबत्तेचेही दार उघडले आहे.
ओडिशातून आणले बियाणेओडिशाच्या एका मित्राकडून मणिपूरच्या ‘चा-खाऊ’ व ओडिशी ‘कालाबात्ती’ या तांदूळ वाणाचे दोन किलो बियाणे मागविले व जुलैमध्ये महेश पाटील यांच्या हलक्या जमिनीत दोन ओळीत ४५, तर दोन रोपांत १० सें.मी. अंतर राखत तिफणीने पेरणी केली. यानंतर पीक ‘ऑरगॅनिक’ पद्धतीने घेण्याचे निश्चित करीत पेरणी ते काढणीदरम्यान केवळ शेण, गोमूत्र यांचाच वापर केला. साधारणतः ‘चा-खाऊ’ १३०, तर ‘कालाबात्ती’ वाण १४५ दिवसांत हाती आले. यापासून ७ ते ८ क्विंटल काळ्या तांदळाचे यशस्वी उत्पादन मिळाले आहे. बाजारात दीडशे ते पाचशे व बियाणे म्हणून हजार ते तीन हजार रुपये प्रतिकिलो दराचा माल उत्पादित केला असल्याचे महेश पाटील यांनी सांगितले.
व्हाइट टू ब्लॅक : तांदळाची नवी नवलाई... प्राचीन काळात काही देशांत राजघराण्यातील रसोईत शिजणारा तांदूळ म्हणून ब्लॅक राईसची ख्याती होती. तो सामान्यांत विस्तारलाच नाही. त्यामुळे आजही ठरावीक ठिकाणीच दिसत असलेला हा तांदूळ तसा आपल्यासाठी एक नवलाईचाच. नागालँडमध्ये बेला राईस, छत्तीसगढमध्ये करियाझिगी, चीनमध्ये फॉरबीडन राईस, तर ओडिशात कालाबात्ती व मणिपुरात चा-खाऊ नावाने हा काळा, ब्राऊन राईस उत्पादित होतो. असा हा देशांतर्गत दुर्मिळ व आपल्या प्रांती नवा असलेला ब्लॅक राईस माळकरंजा येथील माळरानावर उत्पादित झाला आहे.