वाशी (जि. उस्मानाबाद) : कळंब तालुक्यातील २९ वर्षीय विवाहितेचा वाशी तालुक्यातील झिन्नर येथील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला. ही घटना १८ ऑगस्टच्या सायंकाळी उघडकीस आली आहे. ही महिला मागील दहा दिवसांपासून बेपत्ता होती.
वाशी तालुक्यातील झिन्नर येथील शेतकरी दशरथ मुंजाळ यांच्या शेतातील विहिरीत महिलेचे प्रेत तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली. यानंतर पोलीस पाटील यांनी ही माहिती पोनि उस्मान शेख यांना कळविली. माहिती मिळताच पोनि शेख व सहकारी सपोनि किशोर चोरगे, हवालदार सुनील रणदिवे, राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढले. तोपर्यंत पोलिसांनी जिल्ह्यात सर्व ठाण्यांशी संपर्क करून मिसिंगची नोंद आहे का, याची चौकशी केली. त्यानुसार ८ ऑगस्ट रोजी कळंब पोलीस ठाण्यात भावना अमरसिंग पाटील ही महिला बेपत्ता असल्याचे चौकशीतून समोर आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मयत महिलेचे वडील विलास भगवानराव शेजूळ (रा. खरा ताडगाव, ता. माजलगाव) हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शव पाहिल्यावर मयत ही आपली मुलगी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने पारा येथील वैद्यकीय अधिकारी निळे यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. यानंतर शेजूळ यांच्या फिर्यादीवरून वाशी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास सपोनि किशोर चोरगे हे करीत आहेत.