धाराशिव : महाराष्ट्राची शिवकाशी समजल्या जाणाऱ्या तेरखेडा येथील फटाका कारखान्यांमध्ये सध्या दिवाळीसाठी फटाके निर्मितीची लगबग सुरु आहे. यात चोरट्यांनीही उच्छाद मांडला असून, एका कारखान्यातून बॉम्ब बनवण्यासाठी आणलेली ४५ हजारांची रंगीत सुतळीच चोरट्यांनी पळवून नेली आहे. याबाबत वाशी ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला.
तेरखेडा हे फटाका उद्योगासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जवळपास शंभरावर कारखान्यातून येथे वर्षभर फटाका निर्मितीचे काम सुरु असते. आता दिवाळी दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे फटाक्यांची मागणी लक्षात घेऊन कारखानदारांनी निर्मितीला वेग दिला आहे. तेरखेडा येथील फिर्यादी कल्याण रामभाऊ उकरंडे यांचाही कारखाना आहे. या कारखान्यात त्यांनी सुतळी बॉम्ब तयार करण्यासाठी सुतळी आणून ठेवली होती. त्याला रंग देऊन ते खुल्या ठिकाणी वाळवून एका खोलीत ठेवले होते. दरम्यान, अज्ञात चाेरट्यांनी मंगळवारी सुमारे ४५ हजार रुपये किंमतीची ही सुतळीच पळवून नेली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उकरंडे यांनी सायंकाळी वाशी ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.