तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी गावास दूषित पाणीपुरवठा होत असल्याने गावातील तीन हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक प्रशासनास वारंवार सूचना देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंब-मारो आंदोलन करीत शुध्द पाणीपुरवठ्याची मागणी केली.
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी हे जिल्ह्यातील पाणीदार गाव म्हणून ओळखले जाते. या गावच्या तिन्ही बाजूने मोठमोठे तलाव आहेत. या तलावामध्ये वर्षातील तिन्ही ऋतूमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतो. गावातील विहिरी बारमाही तुडुंब भरलेल्या असतात. असे असतानाही ग्रामपंचायतच्या उदासीन कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. गावातील तीनशे कुटुंबांना पिवळसर, हिरवेगार अशुद्ध पाणी मिळत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, गटारी ओसंडून वाहत आहेत. यामुळे डासांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी साथरोगांनी डोके वर काढले आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रशासनाचा निषेध व्यक्त करत शांततेत आंदोलन केले. येत्या दहा दिवसांत गावातील नाल्यांची साफसफाई करावी, तसेच गावातील नागरिकांना तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा करावा अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी दिला.