तुळजापूर (जि. उस्मानाबाद)- तालुक्यातील आरळी बुद्रुक पासून चार किलोमीटर अंतरावरील कसई गावानजीक कार रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यातील पाण्यात काेसळून मायलेकीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली.
कसई येथील वीटभट्टीचालक सचिन पांडुरंग बनसोडे (३४) हे गुलबर्गा येथून आपल्या कुटुंबासह कारने (क्र. एमएच.२५-एएस.६८१७) शुक्रवारी रात्री गावाकडे परतत हाेते. साधारपणे रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ते गावानजीक आले असता, अचानक ब्रेक मारल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यातील पाण्यात काेसळली. मदतीसाठी आजुबाजुला काेणीही नसल्याचे लक्षात आल्यानंतर कारच्या काचा फोडून बनसाेडे हे आपल्या दाेन्ही मुलींना पाण्याच्या बाहेर आणत हाेते. याचवेळी एकीचा हात निसटून खाेल खड्ड्यात पडली. तर दुसरी मुलगी तनुजा हिला सुखरूप पाण्याबाहेर काढले. खाेल खड्ड्यामध्ये पडलेल्या मुलीचा शाेध घेण्यासाठी ते गेले असता, तनुजाही त्यांच्या पाठीमागे लागली. त्यामुळे बनसाेडे यांनी तनुजाला साेबत घेऊन शाेधाशाेध केली.
मात्र, त्यात यश आले नाही. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती एका वाहनचालकाने कसई ग्रामस्थांना दिली. यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत पाण्यात पडलेली कार बाहेर काढली असता पत्नी अंकिता बनसाेडे (२७) या कारमध्येच मृतावस्थेत आढळून आल्या. ताेवर उपस्थितांनी तुळजापूर तसेच उस्मानाबाद येथील अग्निशमन विभागास पाचारण केले. या पथकाने पाण्यात शाेध घेतला असता, पाच वर्षीय मुलगी तृप्ती मृतावस्थेत मिळाली. या घटनेमुळे कसई गावावर शाेककळा पसरली आहे. दरम्यान, कारचालक असलेले वडील सचिन बनसाेडे व दुसरी मुलगी तनुजा हे दाेघे दुर्घटनेतून बचावले.
अचानक ब्रेक मारला अन् गाडी खड्ड्यात...बनसोडे हे आरळी मार्गे आपल्या गावी कसई येथे परतत हाेते. गावापासून साधारपणे एक किलोमीटर अंतरावर आले असता, त्यांनी अचानक ब्रेक मारला अन् संबंधित कार पलटी हाेऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यातील पाण्यात काेसळली. प्रसंगावधान राखत बनसोडे यांनी कारची काच फाेडून एका मुलीस खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढले. परंतु, पत्नी व अन्य एका मुलीस ते वाचवू शकले नाहीत.