लोकमत न्यूज नेटवर्क ढोकी (जि. धाराशिव) : अडीच वर्षे वर्षा बंगल्याच्या माडीत उतरला नाहीत, माझ्या दाढीपर्यंत केव्हा पोहोचाल? याच दाढीला तुमच्या अनेक नाड्या माहिती आहेत. माझ्या नादाला लागू नका, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून बुधवारी ढोकी येथे दिला. यावेळी, राज्यात राईट टू हेल्थ कायदा आणणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
शिवसंकल्प अभियानांतर्गत बुधवारी ढोकी (जि. धाराशिव) येथील तेरणा कारखान्याच्या मैदानावर कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेना चोरली, असे रोज गावभर सांगत फिरता. अरे तुमच्याकडे लोक आहेत कुठे, रोज किती रडणार? शिवसेना आणि बाळासाहेब या चोरायच्या वस्तू आहेत? त्यांना बाळासाहेबांचे विचार नको, पैसे हवे आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली.
राइट टू हेल्थ कायदा आणणार प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून १८० कोटी रुपये गरजूंना वाटप केले. आता लवकरच राज्यात आपण राइट टू हेल्थ कायदा आणणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.