तुळजापूर (जि. धाराशिव) : चारित्र्यावर संशय घेऊन बहिणीला नेहमी मारहाण केली जात असल्याचा राग मनात धरून मेहुण्याने मित्रांच्या मदतीने अंगावर चारचाकी वाहन घालून आपल्या भाऊजीचा (बहिणीचा पती) खून केला. ही धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील अक्कलकाेट महामार्गावरील कसई पाटी येथे बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाैघांविरुद्ध तुळजापूर पाेलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नाेंद झाला आहे.
तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील बसवेश्वर भीमाशंकर जळकोटे (मयत) हे सोलापूर येथील कांदा मार्केटमध्ये हमालीचे काम करीत होते. तर, त्यांची पत्नी अश्विनी जळकोटे या मंगरूळ येथील कंचेश्वर साखर कारखाना परिसरातील खासगी कॅन्टीनमध्ये मजुरीचे कामासाठी हाेत्या. चारित्र्याच्या संशयावरून या दाेघांमध्ये नेहमी कडाक्याचे भांडण हाेत असे. यातूनच अश्विनी यांना बेदम मारहाणही केली जात हाेती.
हाच राग मनात धरून मेहुणा सागर सुभाष धबडे (रा. कास्ती, जि. साेलापूर) याने आपल्या तिघा मित्रांच्या मदतीने भाऊजी बसवेश्वर जळकाेटे यांना अक्कलकाेट महामार्गावरील कसई पाटी येथे बेदम मारहाण केली. मारहाणीत बसवेश्वर जळकाेटे अक्षरश: रक्ताने माखले हाेते. अशा गंभीर जखमी अवस्थेत ते रस्त्याच्या कडेला उभे असतानाच सागरने आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन त्यांच्या अंगावर घातले असता ते रक्ताच्या थाराेळ्यात पडले.
उपस्थितांनी गंभीर जखमी अवस्थेत बसवेश्वर यांना खाजगी वाहनातून मंगरूळ येथील आराेग्य केंद्रात दाखल केले. परंतु, प्रचंड रक्तस्राव सुरू असल्याने तेथील डाॅक्टरांनी वाहनातच तपासणी करून तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. ताेवर उशीर झाला हाेता. उपस्थित डाॅक्टरांनी तपासणी करून बसवेश्वर यांना मयत घाेषित केले. यानंतर पाेलिसांनी संबंधित घटनेचा पंचनामा करून शव नातेवाइकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मयताची बहीण वनिता सिद्धेश्वर ममाने (रा. कसई) यांनी गुरुवारी तुळजापूर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मयताची पत्नी, मेहुणा व अन्य तिघे अशा चाैघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेपूर्वी नेमकं काय घडलं हाेतं?बुधवारी सायंकाळी ६ वाजता मयताची पत्नी अश्विनी, मुलगा आणि मुलगी असे तिघे फिर्यादी वनिता ममाने यांच्या घरी गेले हाेते. भाऊ घेण्यासाठी आल्याने अश्विनी आपल्या मुलांसह कसई पाटीवर गेल्या हाेत्या. यावेळी त्यांच्यासाेबत वनिता आणि त्यांचा मुलगा ओंकारही हाेता. पिकअपमधून उतरून अश्विनी मुलांसह भाऊ थांबलेल्या कारकडे जात असतानाच आतमध्ये सागर धबडे (अश्विनी यांचा भाऊ), इतर तिघे आणि बसवेश्वर हेही हाेते. पत्नीला पाहून ‘अशू, तुझ्या भावाने खूप मारले गं’ असं म्हणत बसवेश्वर माेठ्यानं ओरडले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत ते गाडीतून उतरून रस्त्याच्या कडेला थांबले असता, सागर याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यात ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात पाेहाेचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्याेत मालवली, असे वनिता ममाने यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.