आंबी (जि. उस्मानाबाद) : भूम न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घेत नसल्याचा राग धरून चौघा भावांनी अनिता निवंता शिंदे (४५) या आपल्या बहिणीचा तलवारीने गळा चिरून निर्घृन खून केला. ही थरारक घटना परंडा तालुक्यातील रोहकल येथील पारधी पिढीवर रविवारी सकाळी ९ वाजेदरम्यान घडली.
या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंडा तालुक्यातील रोहकल येथील पारधी पिढीवर वास्तव्यास असलेल्या अनिता निवंता शिंदे या महिलेने २०१६ मध्ये आंबी पोलीस ठाण्यात आपल्या चौघा भावांविरूद्ध फिर्याद दाखल केली होती. यात त्यांनी भाऊ बापुराव रामा काळे, बाळराजा रामा काळे, समाधान रामा काळे व सुदीन रामा काळे (सर्व रा. पारधी पिढी, रोहकल) यांनी आपल्या पतीचे अपहरण केल्याचे म्हटले होते. त्यानुसार संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल होऊन हा खटला भूम सेशन कोर्टात सुरू होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, सपोनि पालवे, हिंगे आणि पोलीस उपनिरीक्षक वाघुले यांनी घटनास्थळास भेट देऊन तपासाला गती दिली. या प्रकरणी मयत अनिता यांचे पती निवंता उर्फ निवांत्या बिरक्या शिंदे (वय ५०) यांनी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून उपरोक्त चौघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास सपोनि पालवे हे करीत आहेत.
खटला मागे घेण्यासाठी दबावसदरील खटला काढून घे म्हणून चौघे भाऊ मयत अनिता यांच्यावर वारंवार दबाव टाकत होते; परंतु त्यांनी कोर्टातून केस काढून घेण्यास नकार दिला. खटला मागे न घेतल्याचा राग मानून चौघा भावांनी रविवारी पहाटे ९ वाजेदरम्यान बहीण अनिता यांच्या घरात प्रवेश केला. यानंतर समाधान रामा काळे याने तलवारीने अनिता यांच्या गळ्यावर वार करून जिवे मारले. या थरारानंतर उपरोक्त चौघेही घटनास्थळावरून फरार झाले.