मुरूम : ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने मुरूम शहरात आलेल्या पुरामुळे भिमनगर येथील बौद्ध स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पालिकेकडे बुधवारी करण्यात आली आहे.
भिमनगर येथे मयत झालेल्या लोकांचा अंत्यविधी याच स्मशानभूमीत केला जातो. मात्र, अतिवृष्टीमुळे स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याने मयत झालेल्या व्यक्तीवर सध्या स्मशानभूमीच्या बाहेर अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी नगर पालिका प्रशासनाने स्मशानभूमीची तात्काळ डागडूजी करून ती पूर्वावस्थेत करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, मुरूम शहराध्यक्ष बाबा कुरेशी, कार्याध्यक्ष ज्योतिबा शिंदे, गणेश जगदाळे, प्रशांत काजळे, विद्यार्थी शहराध्यक्ष सागर बिराजदार, सोशल मीडिया शहराध्यक्ष व्यंकट खंडागळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.