भूम ( उस्मानाबाद ) : जगाचा पोशिंदा जगला तर देश जगेल; पण या सरकारला शेतकर्यांशी काहीच देणे-घेणे नाही. ते निव्वळ फसव्या घोषणा करतात. स्वत: मुख्यमंत्री सभागृहात आपण शेतकरी असल्याचे सांगतात. असे असेल तर वर्षा बंगल्यावर गाय नेऊन बांधतो, त्यांनी दूध काढून दाखवावी, असे आव्हान अजित पवार यांनी आज भूम येथून दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भूम (जि. उस्मानाबाद) येथे बुधवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मंचावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. राहुल मोटे, आ. राणाजगजितसिंह पाटील, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, अर्चना पाटील, वैशाली मोटे, तालुकाध्यक्ष हणमंत पाटुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती टिका केली.
येत्या निवडणुकीत सरकार हद्दपार कराकर्जमाफी, दुधाचा भाव, शेतीमालाचे हमीभाव, भारनियमन यांसह इतर सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना येत्या निवडणुकीत हद्दपार करा, असे आवाहन पवार यांनी केले. शेतकर्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असतानाही सरकार शांत बसून आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. या सरकारने फसवी कर्जमाफी केली. शेती अडचणीत आली असताना पशुपालनाचा जोडधंदाही सरकारने अडचणीत आणला आहे. दुधाला भाव नाही. विचारल्यास दुग्धमंत्री अभ्यास चालू आहे असे सांगतात. असेच राहिले तर शेतकर्यांचे कसे होणार? अशी चिंता अजित पवार यांनी व्यक्त केली. सभेनंतर नेत्यांसह पदाधिकार्यांनी भूम येथील उपविभागीय अधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देऊन सरकारला भावना कळविण्याची सूचना केली.