लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे बहुउद्देशीय इमारत बांधकामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भात आ.ज्ञानराज चौगुले, आ. सतिश चव्हाण यांनी ही पाठपुरावा केला होता. त्यात लोकमतने ही याविषयी तीन भागात वृत्त प्रसिध्द केले होते.
निझामाच्या राजवटीत मातृभाषेतून शिक्षण घेण्याची सुविधा नव्हती. तेव्हा १९२१ साली लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली. याच शाळेतून मराठवाडा मुक्तीसंग्रामाला खरी ऊर्जा मिळाली. पुढे सन १९४६ ला शाळेचे कामकाज बंद पडले. या शाळेची आठवण म्हणून सन १९८५ ला स्वातंत्र्यसैनिक व ग्रामस्थाच्या पुढाकार घेऊन लोकवर्गीणीतून स्तंभ उभारला. या ठिकाणी १७ सप्टेंबरला विविध सामाजिक संघटना, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे वारस स्तंभास अभिवादन करण्यासाठी येतात. पण १७ सप्टेंबर हा कालावधी पावसाळ्यात येत असल्यामुळे कार्यक्रम घेण्यासाठी अनेक अडचणी येतात. यामुळे येथे एक बहुउद्देशीय इमारत उभारण्याची मागणी गेले अनेक वर्षापासुन करण्यात येते होती.
त्यात आमदार ज्ञानराज चौगुले व आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. तसेच लोकमतने या शाळेचा इतिहास, सध्यस्थिती व कशाची गरज आहे. याविषयी गेले तीन दिवस तीन भागात वृत्तप्रसिध्द केले होती. अखेर शनिवारी छत्रपती संभाजीनगर झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हिप्परगा (रवा) येथील बहुउद्देशीय इमारत बांधकामासाठी आडीच कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल हिप्परग्याचे उपसरपंच विजयकुमार लोमटे यांनी समाधान व्यक्त केले आहे.