उस्मानाबाद -पैसे देण्याच्या कारणावरून महिलेच्या अंगावर राॅकेल ओतून जाळल्याची धक्कादायक घटना मे २०१६ मध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ढेकरी येथे घडली हाेती. या प्रकणी आई, बहिण तसेच भावजईविरूद्ध खुनाचा गुन्हा नाेंद झाला हाेता. उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात हे प्रकरण चालले असता, मृत्यूपूर्व जबाब आणि सरकारी पक्षाकडून करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेऊन न्यायालयाने १५ डिसेंबर राेजी तिन्ही आराेपींना प्रत्येकी जेन्मठेप व ५०० रूपये दंडाची शिक्षा ठाेठावली.
उस्मानाबाद तालुक्यातील ढेकरी येथील ममता नाना पवार (मयत) यांच्यासाेबत सुलाबाई हणमंत काळे (आई), वैशाली ज्ञानेश्वर काळे (भावजई, दाेघी रा.ढेकरी) व महादेवी नंदू शिंदे (बहिण, रा. नरखेड, ता. माेहाेळ) या तिघी पैसे देण्याच्या कारणावरून संगणमत करून भांडत असत. ‘‘तु तेथे कशाला राहते’’, असे म्हणून नेहमी त्रास देत हाेत्या. याच वादातून २४ मे २०१६ राेजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ममता पवार यांच्या अंगावर सलुबाई काळे, वैशाली काळे व महादेवी शिंदे यांनी राॅकेल ओतून पेटविले. पेटलेल्या अवस्थेत ममता पवार यांनी ‘‘मला वाचावा..वाचवा’’ असे म्हणत मंदिर गाठले. भजनासाठी मंदिरात जमलेल्या लाेकांनी महिलेच्या दिशेने धाव घेत अंगावर वाकळ टाकून आग विझविली.
यानंतर पतीने जळीत ममता यांना तातडीने तुळजापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. या ठिकाणी प्रथमाेपचार करून जखमी ममता यांना पुणे येथील रूग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना पाेलिसांनी ममता यांचा जबाब नाेंदविला हाेता. त्यावरून संबंधित तिघींविरूद्ध तुळजापूर पाेलीस ठाण्यात भादंसंचे कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला हाेता. दरम्यान, उपचार सुरू असतानाच ममता पवार यांचा २७ मे २०२१ राेजी मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबाब विचारात घेऊन सदरील प्रकरणात कलम ३०२ वाढविण्यात आले. यानंतर पाेलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले.
हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात चालले असता, जळीत महिलेचा मृत्यूपूर्व जबाब, सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद आणि सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा विचार करून तिन्ही आराेपींना प्रत्येकी जन्मठेप व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अति. सरकारी अभियाेक्ता पंडित जाधव यांनी काम पाहिले. त्यांना काेर्ट पैरवी मपाेना व्ही. आर. वाघमारे यांचे सहकार्य लाभले.