उमरगा : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार प्रकरण, काँग्रेस नेते खा. राहूल गांधी व प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेध तसेच कामगार विरोधी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी उमरगा येथे शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयासमोरील महामार्गावर काँग्रेसच्या वतीने योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन करून आंदोलन करण्यात आले.
उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील बलात्कार पीडीत कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेलेले काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. पालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर योगी सरकारचा निषेध म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार व योगी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी झाली. तहसीलदार संजय पवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जि. प. सदस्य प्रकाश आष्टे, माजी जि. प. सदस्य दिलीप भालेराव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. सुभाष राजोळे, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, विजय वाघमारे, नगरसेवक अतिक मुन्शी, महेश माशाळकर, एम. ओ. पाटील, विक्रम मस्के, गोविंदराव पाटील, अॅड. दिलीप सगर, महालिंग बाबशेट्टी, चंद्रशेखर पवार, अॅड. एस. पी. इनामदार, याकूब लदाफ, प्रकाश चव्हाण, संजय सरवदे आदींची उपस्थिती होती.