- बालाजी बिराजदारलोहारा (धाराशिव ): मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यावे , अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंगळवारी पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, उग्र आंदोलनानंतर धाराशिव जिल्ह्यात सध्या संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत.आज उपोषणाचा ७ वा दिवस असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. दरम्यान, त्यांच्या समर्थनार्थ आंदोलक आक्रमक झाली आहेत. तसेच अनेक आमदार, खासदार यांनी राजीनामे दिली असून अनेकांनी राजीनाम्याची तयारी केली आहे. मात्र, जरांगे यांनी आमदार, खासदार यांनी राजीनामा न देता सरकारवर दबाव आणावा असे आवाहन केले आहे.
दरम्यान, उमरगा लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्राद्वारे विशेष अधिवेशन घेणेची मागणी केली आहे. माझ्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा म्हणून मराठा समाजाच्यावतीने प्रत्येक गावागावात आमरण, साखळी उपोषण करण्यात येत आहे. तर समाजसेवक विनायकराव पाटील यांनी ३ नोव्हेंबर रोजी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला आहे. एकूणच समाजबांधवांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. त्यामुळे सकल मराठा समाजाला तात्काळ सर्व स्तरावर टिकेल असे आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे,अशी मागणी आ.चौगुले यांनी केली.