लोकमत न्यूज नेटवर्क, धाराशिव : मराठा बांधवांनी लाेकसभेच्या मैदानात ‘अबकी बार एक गाव, एक उमेदवार’ अशी घाेषणा देत तयारी सुरू केली आहे. धाराशिव येथे शनिवारी झालेल्या बैठकीत उमेदवारीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. आंदाेलनादरम्यान अंगावर केसेस घेतलेल्या आणि उपाेषण केलेल्या तरुणांना उमेदवारीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. निकष निश्चित करणारा धाराशिव राज्यातील पहिला जिल्हा असल्याचा दावा समन्वयकांनी केला.
जे आरक्षण आम्ही मागितलेच नव्हते, ते १० टक्के आरक्षण सरकार मराठ्यांवर थाेपवीत आहे. यापूर्वीही अशा पद्धतीने आरक्षण दिले हाेते. मात्र, न्यायालयात ते टिकू शकले नाही. याही आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे हे आरक्षण आम्हाला मान्य नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा संघर्ष सुरू केला आहे. गावाेगावी जाऊन बैठका, संवाद सभा घेऊन समाजाशी चर्चा करीत आहेत, तर दुसरीकडे सकल मराठा समाजाने निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविण्याची जाेरदार तयारी सुरू केली आहे.
हे आहेत उमेदवारीचे निकष
मराठा आंदाेलनादरम्यान अंगावर केसेस घेतलेल्या, जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपाेषण केलेल्या तरुणांना प्राधान्य माेठ्या गावातून किमान दाेन तर लहान गावातून किमान एक उमेदवार देण्याची रणनीती आजघडीला साडेचारशेपेक्षा अधिक उमेदवारांची निवडणूक लढविण्याची तयारी
साेलापूर, माढा अन् धाराशिवमध्ये हजार उमेदवार देणार
मराठा आरक्षणाच्या निर्णयात राज्य सरकारने समाजाची फसवणूक केली. याचा निषेध म्हणून आगामी लाेकसभा निवडणुकीत साेलापूर, माढा, धाराशिव या लाेकसभा मतदारसंघांत एक हजारपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल करू. तसेच वाराणसी मतदारसंघात ऑनलाइन अर्ज दाखल करू, असा इशारा सकल मराठा क्रांती माेर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. समन्वयक माउली पवार म्हणाले, ज्या गावचा उमेदवार, त्याच गावचं मतदान असा पॅटर्न राहील. हा पॅटर्न देशभर जाईल. वाराणसी मतदारसंघात महादेव तळेकर, संदीप मांडवे हे उमेदवार असतील.
सकाळी, सायंकाळी हाेताहेत बैठका
गावागावांत सकाळी व सायंकाळी बैठका हाेत आहेत. बैठकांमध्ये लाेकसभा निवडणुकीसाठी देण्यात येणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्कम भरण्यासाठी वर्गणी गाेळा करणे, उमेदवारी अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे आदी मुद्द्यांवर चर्चा हाेत आहे. एखाद्या गावात निकष पूर्ण करणारा एकही उमेदवार नसेल तर मराठा समाजातील अन्य इच्छुक उमेदवारांचा विचार केला जाणार आहे.