कळंब : ग्रामपंचायत निवडणुकीच्या फडात तगडा ‘पहिलवान’ उतरवण्यासाठी गावगाड्यात लगबग सुरू असली तरी ‘नसती कटकट नको !’ म्हणून अनेक संभाव्य उमेदवारांना स्वतःच्या घरातील गृहमंत्र्यांची ‘एनओसी’ मिळत नसल्याचे समोर आले आहे.
निवडणूक पात्र असलेल्या तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम सध्या पेटला आहे. या टप्प्यात इटकूर, येरमाळा, मंगरूळ, दहिफळ, रांजणी, नायगाव, पाडोळी, चोराखळी, कन्हेरवाडी, हावरगाव यासारख्या मोठ्या ग्रा.पं.चाही समावेश आहे. निवडणुका लागलेल्या ५९ गावांतील एकूण १८८ प्रभागातील ४९५ सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी पॅनल उभे करून ग्रा.पं. आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. कुठे राजकीय पक्षांच्या संघटनात्मक बांधणीनुसार तर कोठे गाव पातळीवरच्या गटानुसार हे पॅनल आकाराला येत आहेत. ही सर्व जुळवाजुळव करत असताना त्या-त्या प्रभागात आपल्या आघाडीचा उमेदवार हा तगडा असावा, तसाच तो ‘विनिंग कॅन्डिडेट’ असावा यावर भर दिला जात आहे. विशेषतः आरक्षित प्रवर्गासाठी यासाठी विशेष चाचपणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. यासाठी प्रत्येक गावात राजकीय सक्रियता नसली तरी प्रभागात ‘भावकी’ ते ‘गावकी’ असा सर्वांना चालणारा ‘चेहरा’ निवडण्यावर भर दिला जात आहे. मात्र, गावगाड्यातील राजकारणात पडून चांगले झालेल्यापेक्षा, आहे ती घडी विस्कटल्याचे अनेक ‘दाखले’ गावोगावी समोर दिसत असल्याने ग्रा.पं.च्या उमेदवारीकडे कानाडोळा करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे गावची ग्रा.पं. ताब्यात घेत, गावचे ‘कारभारी’ होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या ‘पॅनल’ प्रमुखांची सध्या निवडणुकीपेक्षा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करतानाच दमछाक होत आहे.
चौकट...
संभाव्य उमेदवारांची संख्या हजारावर...
तालुक्यात आगामी पंधरा जानेवारी रोजी ४९५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी केवळ दुरंगी लढत अपेक्षित व गृहीत धरली तरी किमान एक हजारावर उमेदवार निवडणुकीच्या फडात बुक ठोकणार, हे निश्चित आहे. यामुळे पॅनल प्रमुखांना मोठ्या संख्येने निश्चित करावयाच्या उमेदवार निवडीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
असा पुढील दिनक्रम...
उमेदवारी अर्ज सादर करणे - ३० डिसेंबर
उमेदवारी अर्ज छाननी करणे - ३१ डिसेंबर
उमेदवारी अर्ज माघारी घेणे - ४ जानेवारी