उस्मानाबाद : प्रत्येक वाहनाला हॉर्न असणे आवश्यक आहे. मात्र, हॉर्न कुठे आणि किती वाजवायचा, याचाही नियम ठरवून दिला आहे. याबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना दंड ठोठावण्याची तरतूद मोटार वाहन कायद्यानुसार आहे. जिल्ह्यात सायलेन्सर, फॅन्सी नंबरप्लेट व कर्णकर्कश हॉर्नचे प्रमाण वाढले आहे. शहर वाहतूक शाखा व पोलिसांच्या वतीने १२० जणांवर कारवाई केली आहे. असे असले तरी वाहनधारक नियमांची पायमल्ली करताना आढळून येत आहेत. मागील दीड वर्षात कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या १२० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या व्यक्तींकडून प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असली तरी त्या तुलनेत वाहनतळांची संख्या कमी आहे. त्यामुळे नागरिक बिनदिक्कतपणे नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करीत असतात. अशा ३१ हजार ६११ वाहनचालकांवर कारवाई करून ६३ लाख २२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या ९०० चालकांकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे २४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
फॅन्सी हॉर्नची फॅशन
समाेरच्या व्यक्तीला सावध करण्यासाठी हॉर्नचा वापर केला जातो. मात्र, वाहनांच्या प्रकारानुसार हॉर्नचा आवाज किती असावा, तो कसा असावा, याबाबत नियम ठरवले आहेत. या नियमांचे बहुतांश वाहनधारक पालन करतात. मात्र, काही जण आपल्या वाहनाला विचित्र आवाज येईल, अशा प्रकारचे हॉर्न सायलेन्सर लावतात.
कानाचेही आवाज वाढू शकतात
उस्मानाबाद शहरात मोठ्या प्रमाणात काही वाहनधारक रात्रीच्या वेळी कर्णकर्कश हॉर्न वाजवितात. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांच्या कानाचे आजार जडू शकतात. १८ वर्षाच्या आतील व ५५ वर्षापुढील व्यक्तींना याचा सर्वात जास्त धोका असतो. कानाचे पडदे हे लवचीक असतात. त्यामुळे कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका असतो. असे कान-नाक-घास तज्ज्ञ डॉ. रवींद्र पापडे म्हणाले.
कोट...
कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या वाहनचालकांवर कलम १७७ नुसार कारवाई करून २०० रुपये दंड आकारला जात आहे. नो पार्किंग विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम सुरूच आहे.
इक्बाल सय्यद, वाहतूक शाखा प्रमुख
कर्णकर्कश हॉर्न वाजवला तर
कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या व्यक्तीवर कलम १७७ नुसार २०० रुपये दंड तर कलम ११९ नुसार कारवाई केली तर त्या व्यक्तीला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो.
सध्या शहरात रात्रीच्या वेळी काही तरुण भरधाव वेगाने वाहने चालवित आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून नावालाच कारवाई केली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.