दिलासादायक -संजय निंबाळकर, डाॅ. दीक्षित यांची माहिती
उस्मानाबाद -जिल्ह्यातील काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या येथील उपकेंद्रातील काेराेना तपासणी प्रयाेगशाळेची क्षमता ३ हजारावर नेण्यात आली आहे. ही माहिती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी दिली.
काेराेनाच्या पहिल्या लाटेत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधाेळ-मुंडे यांच्या सहकार्यातून विद्यापीठ उपकेद्रात काेराेना चाचणी सेंटर उभारण्याचे निश्चित झाले हाेते. यासाठी लागणारी जागा, प्रयाेगशाळा उभारण्यासाठी हाेणारा खर्च व्यवस्थापन परिषदेमध्ये कुलगुरू डाॅ. प्रमाेद येवले यांच्या अध्यक्षतेखाली सदर ठराव घेऊन मंजूर करण्यात आला हाेता. या सर्वांच्या प्रयत्नातून उपकेंद्रात प्रतिदिन ४०० नमुन्यांची तपाणी केली जात हाेती. येथे काम करणारे विद्यापीठ उपकेंद्राचे सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रमुख व प्रयाेगशाळेचे नाेडल ऑफिसर आदींनी प्रयत्न करून क्षमतेच्या दुप्पट चाचण्या करण्याचा प्रयत्न केला. याची दखल भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने घेऊन विद्यापीठ उपकेंद्रास ८० लाख रुपयांच्या ४ आरटीपीसीआर मशीन, एक आरएनए एक्सट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून आता चाचण्यांची क्षमता ३ हजारावर पाेहचणार आहे. अनुसंसाधन परिषदेने राज्यात केवळ दाेनच ठिकाणी अशा प्रकारच्या मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. यात उस्मानाबादसह पुण्याचा समावेश असल्याचे संजय निंबाळकर व डाॅ. प्रशांत दीक्षित यांनी सांगितले.