कळंब : शहरात नागरिकांची कोरोना चाचणी व लसीकरणासाठी होणारी गर्दी पाहता चाचणी व लसीकरणासाठी शहरात प्रशासनाने विभागनिहाय व्यवस्था करावी, अशी मागणी आता पुढे आली आहे. चाचणीसाठी वेळेचे बंधन असल्याने उशिरा नावनोंदणीसाठी येणाऱ्या अनेकांच्या चाचण्या होत नसल्याचे समोर येते आहे.
शहर व परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन व आरोग्य विभागाने शहरात लसीकरणासाठी डाॅ. रामकृष्ण लोंढे यांचा दवाखाना व चाचणीसाठी पुनर्वसन सावरगाव विभागातील नगर परिषद शाळा क्र. २ येथे व्यवस्था केलेली आहे. ही दोन्हीही ठिकाणे शहरातील चोंदे गल्ली, शेरी गल्ली, भीमनगर, कल्पना नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, बाबा नगर, गांधी नगर, महसूल कॉलनी, मोमीन गल्ली, मार्केट यार्ड, दत्तनगर, इंदिरा नगर आदी बहुसंख्य लोकसंख्य वस्तीसाठी गैरसोयीचे आहेत.
याची दखल घेऊन शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते मकरंद पाटील, ॲड. मंदार मुळीक, संजय जाधवर, संजय होळे यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आणखी एक कोरोना चाचणी व लसीकरण केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे नगर परिषद शाळा क्र. १ व जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे सुरू करण्याची मागणी केली आहे.
कळंब शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोना चाचणी व लसीकरण करण्यासाठी केंद्र वाढविण्याची आवश्यकता सध्या प्राधान्यतत्त्वावर आहे. त्यातही लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्याचीही मागणी होते आहे. आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळ कमी असल्याने इतर ठिकाणी चाचणी व लसीकरण केंद्र चालू करता येत नसेल तर आणखी मनुष्यबळ वाढविण्याची मागणीही आता पुढे येत आहे.