विवाहितेची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी बेंबळी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील रूईभर येथील राधा अक्षय भोईटे (वय २१) यांनी २३ जून रोजी घरातील छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, पती अक्षय भोईटे, सासरे गणपत व सासू इंदुबाई यांनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे राधाने आत्महत्या केल्याची फिर्याद मयत राधाचे वडील शिवाजी कोळगे यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराचे कुलूप उघडून मोबाइलची चोरी
कळंब : शहरातील बाबानगर भागात राहणारे दादाहरी मोराळे हे २७ जून रोजी पहाटे घराची किल्ली खिडकीच्या आत ठेवून पत्नीसह पायी फिरायला गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्याने खिडकीतील किल्ली घेऊन कुलूप उघडून आत प्रवेश मिळविला. या वेळी चोरट्याने आतील दोन मोबाइल फोन चोरून नेल्याची फिर्याद दादाहरी मोराळे यांनी दिली. यावरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानासमोरील साहित्याची चोरी
उस्मानाबाद : दुकानासमोर ठेवलेले साहित्य चोरीस गेल्याची घटना शहरात २६ जून रोजी घडली. येथील गजानन विभुते यांनी आठवडी बाजार मैदान परिसरात असलेल्या दुकानासमोर लोखंडी नळ व सांगाडा असे साहित्य ठेवले होते. अज्ञात चोरट्याने ते चोरून नेल्याची फिर्याद विभुते यांनी दिली. यावरून येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइलची चोरी
उस्मानाबाद : कळंब येथील रमेश बारकूल, बालाजी बसाळगे व प्रणीत पाटील हे २८ जून रोजी बागवान चौक परिसरात थांबले होते. या वेळी अज्ञाताने या तिघांच्या खिशातील मोबाइल फोन चोरून नेल्याची फिर्याद कळंब पोलिसात दाखल केली. यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुचाकीची चोरी
परंडा : खानापूर येथील राजेंद्र कुदळे यांनी २७ जून रोजी परंडा-सोनारी रस्त्यावरील त्यांच्या हॉटेलसमोर दुचाकी (क्र. एमएच २५/ झेड ५२९४) लावली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याची फिर्याद कुदळे यांनी दिली. यावरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.