कळंब : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम चालू असल्याने रस्त्याशेजारील मोठ्या नाल्याचे पाणी बसस्थानक परिसरात शिरल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्या पाण्याच्या निस्सारणासाठी संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कळंब शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू असल्याने घाण पाणी वाहून नेणारा मोठा नाला सध्या बुजला आहे. त्यामुळे त्या नाल्याचे पाणी बसस्थानक परिसरात शिरले आहे. परिणामी स्थानक परिसरात दुर्गंधी पसरल्याने एसटी महामंडळाचे कर्मचारी, व्यापारी व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
सध्या शहर व परिसरात डेंग्यूसदृश आजाराची साथ चालू आहे. या घाण पाण्याने त्या साथीचा प्रादुर्भाव प्रवाशांना होण्याची शक्यता आहे, याची गांभीर्याने दखल घेऊन स्थानक परिसरात येणारे घाण पाणी रोखावे व त्याला इतरत्र मार्ग काढून द्यावा, परिसरात स्वच्छता करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणीही या निवेदनात केली आहे. यावर तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, भीमा हजारे, रमेश देशमुख, रोहन देशमुख, मनोज शिंदे, सौरभ मुंडे, आदींच्या सह्या आहेत.