कळंब : काठोकाठ भरलेल्या मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा मेन्टेन ठेवण्यासाठी नदीपात्र आणि उजव्या कालव्यातून दोन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या स्थितीत गुरुवारी पाणलोट क्षेत्रात दखलपात्र पाऊस झाल्याने सहा दरवाजे २.७५ मीटर उंचीने उघडून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवला आहे.
मांजरा प्रकल्प मंगळवारी शतप्रतिशत भरला होता. निर्मितीपासून पंधराव्या वेळी व यंदा सलग दुसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो झालेल्या या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून मंगळवारी दुपारी १ वाजता १.२७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यानंतर पाण्याची आवक होत असल्याने व पाणीसाठा मेन्टेन ठेवण्यासाठी बुधवारी मांजरा प्रकल्पाचे सहा दरवाजे ०.५० ते ०.७५ या उंचीने उघडून नदीपात्रात १.४९ क्युसेक विसर्ग सुरू केला होता. यानुसार गुरुवारी सकाळपर्यंत मांजरा प्रकल्पातून १०.८ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यानंतर दुपारपासून परत पावसाला सुरुवात झाली. पाणलोट क्षेत्रातील कळंब, वाशी, केज आदी तालुक्यांत पावसाचा जोर वाढला. रात्रभर पाऊस पडतच राहिल्याने मांजरा प्रकल्पात पाण्याची आवक वाढत राहिली. यामुळे शुक्रवारी सकाळी मांजरा प्रकल्पातील विसर्ग वाढवण्यात आला आहे. एकूण १८ दरवाजांपैकी पाणी सोडण्यात आलेले सहा दरवाजे २.७५ मीटर उंचीपर्यंत उघडले आहेत. यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
दरम्यान, महसूल प्रशासन ॲलर्ट झाले असून, मांजरा प्रकल्पालगतच्या व लाभक्षेत्रातील गावांतील पोलीसपाटील यांना ॲलर्ट राहण्याच्या व तलाठी यांना तत्काळ आपल्या सज्जावर पोहोचण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. आवाडशिरपुरा येथील जुन्या व नव्या गावांचा संपर्क तुटला आहे.