उमरगा : शहरातील वाढत्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी तसेच शिस्त वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी शहरातील व्यापारी महासंघ, प्रतिष्ठित नागरिकांनी वर्गणी गोळा करून शहरातील चौकाचौकात ६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. परंतु, दुरुस्ती खर्च करण्यास पालिका व पोलीस प्रशासन तयार नसल्याने सध्या यापैकी केवळ ६ कॅमेरे सुरू आहेत.
या सीसीटीव्हीचे कंट्रोल रूम उमरगा पोलीस ठाण्यात निर्माण करण्यात आली आहे. शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षकांच्या कार्यलयात टीव्ही व टेबलवर माईकची व्यवस्थाही करण्यात आली. या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेवर नजर ठेवणे सोपे झाले. प्रसंगी भोंग्याद्वारे मार्गदर्शनही केले जात होते. सीसीटीव्हीमुळे शहरातील अवैध धंदे, रोडरोमिओंवर नजर ठेवता येऊ लागली. त्याचबरोबर चोऱ्यांच्या प्रकरणात या सीसीटीव्ही फुटेजचा मोठा उपयोग पोलीस प्रशासनास होत होता. दरम्यान, लोकसहभागातून सीसीटीव्ही बसविण्यात आल्यानंतर मेंटेनन्स खर्च नगर पालिका प्रशासनाने करावा, अशी विनंती व्यापारी महासंघाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आली. परंतु, पालिकेकडून मागील दोन-तीन वर्षात एक रुपयाही यावर खर्च केलेला नाही.
पोलीस प्रशासनाला हे सीसीटीव्ही फायदेशीर ठरत असताना तेही खर्च करण्यास तयार नाहीत. त्यामुळे सुरुवातीचे दीड-दोन वर्ष हा खर्च व्यापारी महासंघाने केला. मात्र, यापुढे हा खर्च करणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी वर्षभरापासून मेंटेनन्स करणे बंद केले आहे. परिणामी सध्याच्या घडीला शहरातील ६५ पैकी ५९ सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. आजघडीला केवळ ६ कॅमेरे सुरू आहेत.
चौकट.......
कोरोनामुळे गेली वर्ष-दीड वर्षात दोन लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक कामे सोडल्यास पालिकेचे कामकाज बंद होते.
सीसीटीव्हीच्या देखभालीसाठी वर्षभर लागणाऱ्या खर्चाची तरतूद करावी लागणार आहे. येणाऱ्या काळात यासाठी नगर पालिकेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करुन सीसीटीव्हीवरील देखभालीचा खर्च उचलू. मात्र, पोलीस प्रशासनानेही थोडाफार खर्च उचलणे अपेक्षित आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा करून मार्ग काढू.
-प्रेमलता टोपगे, नगराध्यक्षा
शहरवासियांच्या सुरक्षिततेसाठी व्यापारी, प्रतिष्ठित, नागरिक या सर्वांनी लोकवर्गणी गोळा करून लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्हीसाठी बसविले. लोकवर्गणी देऊन आपले कर्तव्य पार पडले आहे. तसेच उरलेल्या पैशांतून दोन वर्षांपासून व्यापारी महासंघ देखभाल दुरुस्तीचा खर्च करीत आहे. मात्र, पुढील काळात खर्च करणे शक्य नाही. आता देखभाल दुरुस्तीचा खर्च पोलीस विभाग व पालिकेने करणे गरजेचे आहे. कारण याचा उपयोग पोलीस विभागाला जास्त होणार आहे.
-नितीन होळे, कार्याध्यक्ष, व्यापारी महासंघ