परंडा ( उस्मानाबाद) : बाळंतपणात मृत्यू पावलेल्या महिलेच्या अंत्यसंस्काराची राख चोरी करताना तालुक्यातील देवगाव ( खु ) येथील ग्रामस्थांनी चौघांना राखेसह पकडले. यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या मारहाण व गोंधळात दोघे पळून गेले तर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
देवगाव येथील रेश्मा चौधरी ही महिला २२ फेब्रुवारीस बाळंतपणात एका गोंडस बाळास जन्म देऊन मृत्यू पावली. तिच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रथेनुसार बाळंत महिलेची रक्षा सावडण्याचा व अस्थी वेचण्याचा विधी त्याच दिवशी काही तासांनी करण्यात आला. दरम्यान, रात्री उशिरा स्मशानभूमीत चौघेजण बाळंत मातेच्या अंत्यसंस्कार ठिकाणी संशयास्पद हालचाली करताना काही जणांना दिसले. जादु टोण्यासाठी म्हणून अंत्यसंस्काराची रक्षा घेऊन जात असल्याच्या संशयावरून या चौघांना गावक-यांनी मारहाण करीत गावातील चावडीत आणले. या सर्व गोंधळात दोघे पसार झाले.
काही सुजाण नागरिकांनी ही खबर पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. रामचंद्र कसबे व स्वाती कसबे (रा. बारलोणी जि. सोलापूर) या दोघांना ग्रामस्थानी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर परंडा पोलिसांत जादु टोण्यासाठी बाळंतपणत मयत झालेल्या महिलेच्या राखेची चोरी करणे व धार्मिक भावना दुखावणे या कलमांनुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपास सपोनि मोमीन हे करीत आहेत.