तेर : प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव, सुंदर गाव’ या अभियानांतर्गत तेर मधील ११ अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून अनेक कामे करण्यात आली असून, यामुळे या अंगणवाड्यांचे चित्र पालटून गेल्याचे दिसत आहे.
विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात ‘माझं गाव, सुंदर गाव’ हे अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत लोकसहभागातून ‘माझं कार्यालय, सुंदर कार्यालय’ हा उपक्रम जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सर्व कार्यालयात सुरू आहे. या माध्यमातून अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय व गावातील शासकीय कार्यालयांची रंगरंगोटी व इतर कामे लोकसहभागातून करण्यात येत आहेत. या अंतर्गत तेर येथे तेरणा नदीपात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. तसेच गावातील सुका व ओला कचरा व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पशु-पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करण्यात आली आहे. यासोबतच येथील ११ अंगणवाडींची रंगरंगोटी उद्योजक दत्तात्रय मुळे यांच्या वतीने करण्यात येत आहे. यामुळे लोकसहभागातून अंगणवाड्याचे रुपडे पालटत असल्याचे चित्र आहे.