लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार नियंत्रित करण्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्या वाढवणे, तपासण्या करून घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. फड यांनी विविध गावांना भेट देऊन गावात काम करणारे कर्मचारी आणि ग्रामस्थांसोबत चर्चा केली. तसेच उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, डॉ. कुलदीप मिटकरी, मेघराज पवार, डॉ. किरण गरड, गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने तसेच ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु, नागरिक आजार व आजाराची लक्षणे लपवून कोरोना तपासणी करून घेण्याचे टाळत आहेत. आजाराची वेळीच तपासणी केली तर निश्चितच रुग्णाला फायदा होणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णामुळे इतरांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी स्वतःहून कोरोना तपासणीसाठी पुढाकार घ्यावा. कोणत्याही गावात कोरोना तपासणीसाठी पथक पाठविण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. ग्रामसेवक, सरपंच, नागरिक यांनी गावात लोकांच्या तपासणीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. फड म्हणाले.