उस्मानाबाद : ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात मंगळवारी येथील केमिस्ट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील कमिस्ट सहभागी झाले होते. ऑनलाईन औषध विक्री समाजाच्या हिताची नसल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
ऑनलाईन औषधीसाठी केंद्र सरकार प्रस्तावित अधिसूचनेचा मसुदा घेऊन येत आहे. त्याविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने तीनवेळा भारत बंद, मुक मोर्चा, ठिय्या आंदोलन केले. परंतु, आजवर सरकार याबाबती गंभीर दिसून येत नाही. विशेष म्हणजे, चेन्नई तसेच दिल्ली हायकोर्टाने आॅनलाईन औषध विक्री बंद करावी, असे स्पष्ट निर्देश दिले होते. या निर्देशाचाही सरकारवर काहीच परिणाम झाला नाही. प्रस्तावित अधिसूचनेच्या मसुद्यात संघटनेचे मत जाणून घेणे गरजेचे होते.
परंतु, याबाबतीतही सरकारने संघटनेला बाजुला ठेवल्याचा आरोप करीत मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केमिस्ट संघटनेच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी केमिस्टांच्या वतीने शासनविरोधी घोषणाही देण्यात आल्या. या घोषणांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. संघटनेचे अध्यक्ष धनाजी आनंदे व सचिव महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.