उस्मानाबाद - शिराढोण येथील अष्टपैलू कलाकार राजकुमार कुंभार यांनी कळंब येथे शिवजयंतीनिमित्त तब्बल ३१ तासात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रांगोळीची 'एक्सक्लुसिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड' म्हणून नोंद झाली आहे. यामुळे कलाकार राजकुमार कुंभार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कळंब येथे मागच्या काही वर्षात महाशिवजयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने विविध शिवजन्मोत्सव समित्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करत असतात. यापैकीच श्रीमंतयोगी युवा मंच या कळंबमधील ग्रूपमधे मागच्या दोन वर्षापुर्वी शिवजयंतीनिमित्त भव्यदिव्य अशी छत्रपतींची रांगोळी साकारण्याचा संकल्प केला होता.
यानुसार युवा मंचचे अध्यक्ष अॅड राहुल पांडूरंग कूंभार यांचा हा संकल्प शिराढोण येथील उदयोन्मुख कलाकार राजकुमार कुंभार यांनी तडीस नेला होता. रांगोळी, मायक्रो आर्ट, चित्रकला, मृदुमातीकला अशा विविध कलाप्रकारात माहिरता हाशील केलेल्या राजकुमार यांनी रेकॉर्ड करणारे अदभूत कलाविष्कार सादर केलेले आहेत. श्रीमंतयोगी युवा मंचच्या संकल्पानुसार त्यांनी ४ हजार ७२५ किलो रंगीत रांगोळीचा वापर करत, तब्बल १९ हजार २०० स्क्वेअर फूट आकारात छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी साकार केली होती. ही भव्य कलाकृती एकट्या राजकुमार यांनी सलग ३१ तास ४५ मिनिटात पुर्ण केली होती. आत्ता या उपक्रमाची कला क्षेत्रातील मानाच्या अशा 'एक्सक्लुसिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड' साठी निवड झाली आहे. यामुळे संयोजक असलेल्या कळंब येथील श्रीमंतयोगी युवा मंचच्या पदाधिकारी व सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे. शिवाय विविध रेकॉर्ड आपल्या नावे असलेल्या शिराढोण गावातील अष्टपैलू कलाकार राजकुमार कुंभार यांच्यानावे आणखी एक रेकॉर्ड नोंदले गेले आहे.