उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याला चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी २०१४-१५ मध्ये ऊस घातला होता. परंतु, चार वर्षाचा कालावधी लोटूनही संबंधित शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी छदामही मिळालेला नाही. याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन गुरूवारपासून आंदोलन सुरू केले आहे.
अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. असे असतानाही आता दुष्काळात पिचलेल्या शेतकऱ्यांना नाडण्याचे काम कारखान्याकडून सुरू आहे. नितळी येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याला चिकुंद्रा येथील शेतकऱ्यांनी २०१४-१५ मध्ये ऊस घातला होता. ऊस गेल्यानंतर साधारणपणे २० ते २५ दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणे अपेक्षित असते. परंतु, तसे झाले नाही. चार वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी छदामही मिळालेला नाही. मध्यंतरी काही शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कारखान्याकडून धनादेश देण्यात आले. मात्र, सदरील धनादेश बाऊंस झाले. याप्रकारामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे.
या शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी छावा संघटना सरसावली आहे. या संघटनेने शेतकऱ्यांना सोबत घेत गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू कोळी, कार्याध्यक्ष जीवन र् ंइंगळे, जिल्हाध्यक्ष महेश गवळी, काकासाहेब राऊत, अमरभाई शेख यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत. जोवर ऊसबिल मिळणार नाही तोवर आंदोलन थांबविले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता कारखाना काय भूमिका घेतो? याकडे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.