धाराशिव : उमरगा शहरात १४ वर्षी मुलीचा विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या हेल्पलाईनवर मिळाली होती. यावरून महिला व बालविकास आयुक्तालय कार्यालयातून दूरध्वनीवरून आदेश येताच जिल्हा महिला व बालविकास विभाग, पोलिस आणि आरोग्य प्रशासनाच्या पथकाने सोमवारी तात्काळ लग्नमंडपात जावून अक्षदा पडण्यापूर्वीच हा बालविवाह रोखला.
रविवारी रात्री चाईल्ड हेल्प लाईनच्या राज्य कंट्रोल कार्यालयात दूरध्वनीवरून उमरगा येथे गणेश थिएटर जवळ २१ वर्षी मुलासोबत १४ वर्षीय मुलीचा विवाह लावून दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. ही माहिती तात्काळ धाराशिव महिला व बाल कल्याण विभागाला कळवून कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी धाराशिव महिला बाल विकास विभागाच्या पथकाने उमरगा येथे पोलिस, आरोग्य विभाग, नगर परिषद व अंगणवाडी सेविका यांना सोबत घेऊन लग्न स्थळ गाठले. त्यानंतर परिवाराच्या सदस्यांना विवाहाचे नियम, कायदे याबाबत समुपदेशन करून हा विवाह रोखण्यात आला.
दरम्यान, अल्पवयीन मुलगी, मुलगा व व परिवारातील सदस्यांना महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाराशिव येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यासाठी नेले आहे. ही कारवाई धाराशिव महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी विभावरी खूने, चाईल्ड लाईनच्या वंदना कांबळे, रविराज राऊत, विकास चव्हाण, उमरगा समुपदेशन केंद्राचे राऊ भोसले, अमर भोसले, आरोग्य विभागाचे डॉ. विनोद जाधव, ईश्वर भोसले, राखी वाले, उमरगा पोलीस विभागाचे पोहेकॉ अतुल जाधव, पोकॉ विलास चव्हाण, सूरज गायकवाड, गोपाळ मालचमे, नगर परिषद विभागाचे बी. जी. गायकवाड, रमेश शिंदे, अंगणवाडी सेविका मनीषा सांगवे, ज्योती मुळे, तेजस्वी तिर्थकर, महादेवी लोहार, ललिता गावडे, फरजाना शेख, बेबीनंदा सावंत यांनी केली.
आधारकार्डही बनविले बनावटहे पथक बालविवाह रोखण्यासाठी दाखल झाल्यानंतर संबधित मुलीच्या परिवाराने मुलीचे वय १८ पेक्षा जास्त असल्याचे सांगत २००४ साली तिचा जन्म झाल्याचा दावा केला. तसेच पुरावा म्हणून आधार कार्डही दाखविले. परंतु, हे आधार कार्ड बनावट असल्याचा संशय आल्याने पथकाने मुलीला व मुलाला शहरातील एका आधार केंद्रात नेून तेथे आधार कार्ड स्कॅन केले. यावेळी आधार कार्डवर मुलीची जन्मतारीख २००९ असल्याचे निदर्शनास आले. तसेच मुलीच्या शाळेच्या टीसीवरही हीच तारीख आढळून आली.