कळंब (उस्मानाबाद ) : तालुक्यातील बहुला येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था ‘वर्ग चार, शिक्षक मात्र एक’ अशी झाल्याने संतप्त ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शाळेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे दिवसभर याठिकाणी कार्यरत असलेल्या एकमेव शिक्षीका विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत बसून होत्या.
कळंब तालुक्यातील बहुला हे गाव बीड जिल्ह्याच्या सीमेवर आहे़ गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत प्राथमीक शाळा आहे. शाळेत चार वर्गासाठी शिक्षण विभागाने दोन शिक्षिकांची नियुक्ती केली होती़ यातील एक शिक्षिका गत वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून अर्जित, दीर्घ, वैद्यकीय व प्रसुती अशा वेगवेगळ्या रजा सवलतीचा लाभ घेत रजेवर गेलेल्या आहेत. त्यामुळे गत अनेक महिन्यांपासून बहुला शाळेची अवस्था ‘वर्ग चार, शिक्षक एक’ अशी झाली आहे.
परिणामी शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिकेस मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक ते शाळा उघडणे, लावण्याची कामे करावी लागत आहेत़ शिवाय नियमित बैठका, प्रशिक्षण, पत्रव्यवहार आदी कामांचा भार त्यांच्या खांद्यावर पडला आहे़ यात क्षमतेने काम करूनही शैक्षणीक कामकाजावर नकळत परिणाम होत आहे. यासंदर्भात वारंवार मागणी करूनही शिक्षण विभाग बहुला येथील शाळेतील शिक्षकांच्या प्रश्नाला गांभीर्याने घेत नसल्याने संतप्त झालेल्या पालक, विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शाळेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिवसभरात एकही विद्यार्थी शाळेत फिरकला नाही. शाळेच्या एकमेव शिक्षिका तथा मुख्याध्यापिका दिवसभर एकट्याच विद्यार्थ्यांची प्रतिक्षा करत बसल्या होत्या.
तीव्र आंदोलन करूबहुला येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख आश्रूबा बिक्कड, बाबुराव शेळके, हाजू शेख, सतीश कोठावळे, माजी सरंपच नंदकिशोर कोठावळे, पोपट कोठावळे, माजी उपसरपंच उद्धव शेळके, बाळकृष्ण बिक्कड आदींनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देऊनही शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेकडे फिरकले नाहीत़ त्यामुळे आता बहिष्काराचा निर्णय घेतला असून, यापुढील काळात दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आश्रुबा बिक्कड यांनी दिला आहे.
ना केंद्रप्रमुख आले ना विस्ताराधिकारीआपल्या केंद्रातील एका शाळेवर पालक, विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला असताना केंद्रप्रमुखांनी शाळेला भेट देण्याची तसदी घेतली नाही़ शिवाय शिक्षण विभागाचे विस्तार अधिकाऱ्यांनीही शाळेत पाऊल ठेवले नाही़ केवळ गट शिक्षण कार्यालयाचे साधनव्यक्ती संजय कुंभार यांनी भेट देऊन चर्चा केली़
वरिष्ठांना माहिती दिलीबहुला येथील एक शिक्षीका दीर्घ रजेवर असल्याने, एकाच शिक्षिकेवर शाळेचा भार आहे. आगामी समायोजनात याठिकाणची एक जागा रिक्त दाखवून, या प्रक्रियेतून शिक्षक घ्यावा लागणार आहे. हे सर्व अधिकार वरिष्ठ कार्यालयास असून, यासंबंधी आम्ही वरिष्ठांना पत्रव्यवहार केला केल्याचे गटशिक्षणाधिकारी यमुना देशमुख यांनी सांगितले़