कळंब : गेली अनेक दशके तालुक्यात असतानाही तालुक्याशी जोडणारा पक्का रस्ता नसलेल्या सौंदना (ढोकी) गावाला जोडणाऱ्या रस्त्याचा भाग्योदय होणार असून, नुकताच यासंदर्भात अंशतः बदल करून कामास मंजुरी घेण्यात आल्याची माहिती आ. कैलास पाटील यांनी दिली.
सौंदना-ढोकी हे साधारणतः दोनशे उंबरठे व आठशे लोकसंख्या असलेले छोटेसे गाव. या गावातील रस्त्याचा प्रश्न मागच्या अनेक दशकांपासून प्रलंबित होता. तडवळ्यापासून पाच व सातेफळ गावापासून अवघ्या एक किमी अंतरावर हे गाव आहे. सातेफळ ते सौंदना या दोन गावाला जोडणाऱ्या अवघ्या एक किमी अंतराच्या पाणंद रस्त्यावरचा चिखल तुडवत अनेक पिढ्यांची दमछाक झाली असताना मागच्या काही वर्षांत या पाणंद रस्त्याचा पक्का रस्ता झाला. पण, पुढे अवघ्या एकच वर्षात तेथे रस्ता कमी अन् खड्डे जास्त अशी विदारक स्थिती निर्माण झाली. पुढे ही फजिती वर्षानुवर्ष चालली. याच संदर्भाने ‘लोकमत’ने मध्यंतरी ‘स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही भाग्योदय होईना’ असे ठळक वृत्त प्रसिद्ध करून सौंदणेकरांच्या वेदना प्रकर्षाने मांडल्या होत्या.
दरम्यान, राज्यमार्ग २११ ते भोसा, सातेफळ, सौंदणा या इतर जिल्हा मार्ग ३६ च्या काही अंतरावरील सुधारणेसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यात सातेफळ ते सौंदणा ढोकी हा अतिशय खराब असलेल्या भागातील रस्ता सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच अंशतः बदल करून पन्नास लाख रुपयांच्या नवीन कामास मंजुरी घेण्यात आली आहे, असे आ. कैलास पाटील यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
सातेफळ ते सौंदना या रस्ताकामासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यात प्राधान्याने, ८/५०० ते ९/५०० किमी या खराब झालेल्या भागाची सुधारणा करण्यात येणार आहे. यासंबंधी पुढील प्रक्रिया सुरू आहे.
- संजय कोरडे, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग. कळंब
या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. गावात चारचाकी तर सोडा, दुचाकी येणेही दुरापास्त झाले. त्यामुळे मंजूर झालेले काम तत्काळ सुरू करण्यात यावे व ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी.
- चांगदेव कुटे, सौंदणा ढोकी