तामलवाडी : पहिलीच्या वर्गातील मुलांच्या शिकण्यात ऑनलाईन पद्धतीला मर्यादा येत असल्यामुळे तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विठ्ठल नरवडे यांनी गृहभेटीद्वारे मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
ऑनलाइन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष संवाद साधून शिकवणे, हाच लहान मुलांसाठी एक प्रभावी आणि परिणामकारक मार्ग आहे. कोरोनाच्या संकटामुळे पहिली ते चौथीचे वर्ग केव्हा सुरू होतील, याची खात्री नाही. त्यामुळेच इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी शिक्षक विठ्ठल नरवडे यांनी शिक्षण प्रक्रियेत ऑनलाइन शिक्षणाचा मार्गही अवलंबला. त्यानंतर मुलांची पडताळणी केली. ज्या बाबी, कल्पना मुलांना अवगत होण्यास अडचण येते, त्यासाठी प्रत्यक्ष भेटीतून संवाद व साहित्याच्या माध्यमातून, अध्ययन अनुभवाद्वारे धडे दिले. मुले पूर्णवेळ घरीच असल्याने घरातील कित्येक गोष्टींचा, कृतींचा मुलांच्या शिक्षणासाठी कसा उपयोग करता येईल, हेही पालकांना भेटून समजावून सांगितले.