कळंब.... शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने संपूर्ण कळंब शहर काही दिवस पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ करावे, अशी मागणी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील व्यापारी संघटनांनी केली आहे.
कळंब शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. प्रशासनाने विविध निर्देश देत निर्बंध लागू केले असले तरी नागरिकांत ‘सुधारणा’ होत नाही. प्रशासनाने अत्यावश्यक सेवासाठी काही व्यवसायांना संधी दिली आहे. तर इतर व्यावसाय पूर्णपणे बंद ठेवले आहेत.
काही लोक अत्यावश्यक सेवेच्या संधीचा गैरफायदा घेत आहेत. अकारण शहरात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच लोक सकाळी ७ ते ११ या वेळेत मोठी गर्दी करत आहेत. हा सर्व प्रकार वाढत्या रुग्णसंख्येच्या काळात गंभीर आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर शहर पूर्णपणे बंद करण्याचा विचार फिरत होता. पुढे काही पदाधिकारी व संघटनानी एकत्र येत याविषयी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत शहर संपूर्णत: बंद ठेवावे, अशी मागणी केली आहे.
चौकट...
विविध पदाधिकारी, संघटनांची मागणी
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कळंब शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीच्या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, भाजपाचे तालुका प्रमुख अजित पिंगळे, माजी नगराध्यक्ष किरण हौसलमल, भाजपा शहराध्यक्ष संदीप बाविकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रदीप मेटे, नगरसेवक मुश्ताक कुरेशी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस अतुल गायकवाड रायुकॉचे प्रदेश सदस्य शंतनू खंदारे, भाजपा तालुका चिटणीस प्रशांत लोमटे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुशील तीर्थकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हर्षद अंबूरे, सराफा संघटनेचे अध्यक्ष किशोर गोरे, आडत असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत फाटक, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शिवराज होनराव, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर मोरे, नाभिक महामंडळाचे अध्यक्ष प्रेमचंद गोरे, टिपू सुलतान ब्रिगेडचे अकीब पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.