उस्मानाबाद : दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी १०० टक्के क्षमतेने बस धावू लागल्या. पहिल्या दिवशी प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद पाहावयास मिळाला. मात्र, कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने प्रवासी मास्क, सॅनिटायझर वापरण्यावर भर देत असल्याचे दृष्टीस पडले. तसेच महामंडळाकडूनही बसेस सॅनिटाईझ केल्या जात आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट धडकली. मार्च महिन्यातही प्रतिदिन रुग्ण आढळून येत होते. एप्रिल महिन्यात रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने शासनाने कडक निर्बंध लागू करण्यात आले हेाते. १५ एप्रिलपासून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी सेवा बंद करण्यात आली. मागील माही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने सोमवारपासून पुन्हा बससेवा सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी सहा आगारातून ४८ बसेस सोडण्यात आल्या. पहिल्या दिवशी बसेसला प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद पाहावयास मिळाला. बसमध्ये प्रवास करताना प्रवासी सॅनिटायझर, मास्कचा वापर करताना आढळून आले. तसेच एसटी महामंडळाकडून बसेसच निर्जंतुकीकरण केले जात होते. प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेऱ्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.
लॉकडाऊनपूर्वी रोज एसटीच्या फेऱ्या
१८००
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या १,३०,०००
सोमवारी प्रवास केलेले प्रवासी
१०००
अत्यावश्यक कामासाठीच प्रवास
मला कामानिमित्त दररोज ढोकी येथून उस्मानाबादला यावे लागते. आता एसटी बस सुरू झाल्याने दररोज प्रवास करता येणार आहे.
किशोर कांबळे, प्रवासी
ग्रामीण भागातून शहरात कामानिमित्त येण्यासाठी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत होता. त्यासाठी वेळ व पैसा खर्च होत. आता बस सुरू झाल्याने गावाहून ये-जा करणे सुलभ झाले आहे.
कुंडलिक गायकवाड, प्रवासी
बसने सोलापूर, लातूरला गर्दी
उस्मानाबाद विभागातील सहा आगारातून सोमवारपासून बसेस धावू लागल्या आहेत. उस्मानाबाद स्थानकातून सोलापूर, लातूर या मार्गावर धावणाऱ्या बसला प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळाली. पुणे बसला प्रवाशांचा प्रतिसाद पाहावयास मिळाला. उमरगा, तुळजापूर, भूम. परंडा, तुळजापूर आगारातूनही सोलापूर, लातूर मार्गावर बसला प्रवासी मिळाले. तर कळंब आगारातून लातूर व केज मार्गावर बसला प्रवाशांचा प्रतिसाद होता.
कोट...
उस्मानाबाद बसस्थानकातून सोमवारी लातूर, सोलापूर, पुणे या बसला प्रवाशांचा प्रतिसाद होता. पुणे मार्गावर गाड्या वाढविण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने बस सॅनिटाईझ केल्या जात आहेत. तसेच प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.
पी.एम. पाटील, आगारप्रमुख, उस्मानाबाद