उस्मानाबाद : दिवसेंदिवस वाढत चालल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
देशातील वाढती महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी देशव्यापी आंदोलन केले जात आहे. शुक्रवारी उस्मानाबादेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांन देशात हुकूमशाही सुरु झाली आहे. बेरोजगारी महागाईच्या प्रश्नावर बोलणाऱ्यांना ईडीची भिती दाखवून त्यांना गप्प केले जात असल्याचा आरोप केला.
केंद्र सरकारने आणलेली अग्निपथ योजना आणि जीवनावश्यक वस्तूवरील लावण्यात आलेले जीएसटी मागे घेण्यात यावा, ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार मदत द्यावी, पीक कर्ज माफ करावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. यावेळी ॲड. विश्वजीत शिंदे, खलील सय्यद, राजाभाऊ शेरखाने, सिध्दार्थ बनसोडे, स्वप्नील शिंगाडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.