‘राफेल’वरून काँग्रेस आक्रमक; उस्मानाबादेत जिल्हा कचेरीसमोर केली निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 06:09 PM2019-01-03T18:09:27+5:302019-01-03T18:17:45+5:30
काँग्रेसच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही साथ मिळाली.
उस्मानाबाद : ‘गली गली में शोर है, चौकीदार चोर है’, ‘राफेल घोटाळ्याची चौकशी होत कशी नाही, झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. काँग्रेसच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही साथ मिळाली.
केंद्र सरकारने राफेल या लढावू विमान खेरेदीत प्रचंड आर्थिक, नैतिक भ्रष्ट्राचार केला आहे़ एवढ्यावरच न थांबता सरकारने सर्वोच्च न्यायालयातही खोटी माहिती देऊन न्याय संस्थेची पर्यायाने देशवासियांची दिशाभूल केली. त्यामुळे राफेल खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सरकार विरोधाक प्रचंड घोषणाबाजी केली. जोपर्यंत सरकार व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करीत नाही, तोवर शांत बसणार नसल्याचा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. आंदोलनात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, युवकचे माजी प्रदेश सचिव अॅड़ जावेद काझी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, विनोद वीर, पांडुरंग कुंभार, अभिजीत देडे, सलीम शेख, ऋषीकेश हंचाटे, दर्शन कोळगे, शमियोद्दीन मशायक, भाऊसाहेब उंबरे, अंगुल बनसोडे, पंचायत समिती सदस्य अश्रुबा माळी, बाळासाहेब मुंडे, विधी विभागाचे अॅड़ विश्वजित शिंदे, अॅड़ राहुल लोखंडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीचाही सक्रीय सहभाग
काँग्रेसच्या या आंदोलनाला पाठींबा देत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनीही सक्रीय सहभाग नोंदविला. यावेळी युवराज नळे, दत्ता बंडगर, माणिक बनसोडे, बाबा मुजावर, ईस्मार्लल शेख, सनी पवार, अॅड़ मंजूषा मगर,अस्मिता कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झालेला नसेल तर सरकार संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यास का घाबरतेय? असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला.