धाराशिव : राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य सेवा कोलमडत असल्याचा आरोप करीत धाराशिव शहर काँग्रेस कमिटीने गुरुवारी येथील मेडीकल कॉलेज परिसरात निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नांदेडसह राज्याच्या काही भागातील शासकीय दवाखान्यात औषध, गाेळ्यांचा पुरेसा पुरवठा न झाल्याने रूग्ण दगावू लागले आहेत. हे सत्र सुरूच आहे. असे असले तरी राज्य सरकारकडून ठाेस उपाययाेजना केल्या जात नाहीत. धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात औषधांचा ठणठणाट आहे. परिणामी, रुग्णांची हेळसांड होत आहे. आरोग्य सुविधा पुरविण्यात सरकार कमी पडत असल्याचा आरोप करीत गुरुवारी शहर काँग्रेसच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर निदर्शने केली. यावेळी औषधांचा पुरवठा सुरळीत करा, सत्ता संघर्ष जोमात आरोग्य सेवा कोमात, कुठे हरवला विकास आरोग्य सेवा झाली भकास, निष्पाप नागरिकांचा जीव घेणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, अशा घोषणांनी मेडीकल कॉलेज परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, दर्शन कोळगे, अशोक शेळके, शहाजी मुंडे, शिला उंबरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.