शिवसेनेला ‘हात’ दाखवीत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत; उस्मानाबाद जिल्हा बँकेत महाआघाडीमध्ये फूट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:36 PM2022-03-08T18:36:17+5:302022-03-08T18:37:08+5:30
भाजपला बँकेत एंट्रीही मिळू शकली नाही. या विजयाने महाविकास आघाडीत मोठा उत्साह संचारला होता. मात्र, हा उत्साह फार काळ टिकू शकला नाही.
उस्मानाबाद : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीचा मोठा ड्रामा पहायला मिळाला. एकत्र येऊन गुण्यागोविंदाने निवडणूक लढविल्यानंतर आता पदाधिकारी निवडीवेळी सेनेला हात दाखवीत काँग्रेस व राष्ट्रवादीने दोन्ही पदे आपल्या पदरी पाडून घेतली. यामुळे आघाडीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच फूट पडल्याचे स्पष्ट झाले.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५ जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यातील पाच जागा बिनविरोध निघाल्या होत्या, तर १० जागांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला. यामध्ये सर्वच दहाही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. परिणामी, भाजपला बँकेत एंट्रीही मिळू शकली नाही. या विजयाने महाविकास आघाडीत मोठा उत्साह संचारला होता. मात्र, हा उत्साह फार काळ टिकू शकला नाही.
७ मार्चला बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम लावण्यात आला. यासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नामनिर्देशने स्वीकारण्यास सुरुवात झाली. यावेळी काँग्रेसचे बापूराव पाटील यांनी चेअरमन, तर राष्ट्रवादीचे मधुकर मोटे यांनी व्हाईस चेअरमन पदासाठी अर्ज दाखल केला. यापाठोपाठ सेनेचेही अर्ज दाखल झाले. सेनेकडून चेअरमन पदासाठी संजय देशमुख, तर व्हाईस चेअरमन पदासाठी बळवंत तांबारे यांनी अर्ज दाखल केले. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी माघार घेण्याच्या वेळेपर्यंत प्रयत्न झाले. मात्र, कोणीही माघार न घेतल्याने शेवटी मतदान घ्यावे लागले. यामध्ये ११ मते घेऊन बापूराव पाटील व मधुकर मोटे विजयी झाले, तर सेनेचे उमेदवार संजय देशमुख व बळवंत तांबारे यांना प्रत्येकी ४ मते पडली.
आलबेल असताना पडली ठिणगी...
महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अगदी निवडीच्या काही काळ आधीपर्यंत सर्व काही आलबेल होते. मात्र, काही तास आधी सेनेतील एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला आणि सेनेचे अर्ज भरले गेले. अगदी निवडीनंतरही बँकेचे नूतन अध्यक्ष बापूराव पाटील यांनी आघाडीतील ही बिघाडी नाही. काही निर्णय अचानक होतात. त्यातलाच हा प्रकार असल्याचे सांगून फुटीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.