लोहारा : लोहारा नगरपंचायतच्या प्रभाग दोन मधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री उत्तम कांबळे विजयी झाल्या.आज झालेल्या मतमोजणीत जयश्री कांबळे यांना १२५ मते मिळाली असून, सत्ताधारी राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवारांनाही पराभवाचा सामना करावा लागला़
लोहारा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जातीच्या मिहिलेसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग दोनमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री वाघमारे विजयी झाल्या होत्या. मात्र, वाघमारे यांचे पाच महिन्यापूर्वी निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. या एका जागेसाठी काँग्रेसकडून जयश्री उत्तम कांबळे यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने जयश्री वाघमारे यांच्या स्नुषा मोनाली योगेश वाघमारे यांना उमेदवारी दिली. कुसूम श्रीपती सुरवसे व प्रभावती उमाकांत सगट यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नगरपंचायतीत एकत्रित सत्ता असल्याने शिवसेनेने ही जागा राष्ट्रवादी पक्षाला बिनविरोध मिळावी म्हणून उमेदवार दिला नाही़ रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत ३९० पैकी २७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ सोमवारी सकाळी दहा वाजता नगरपंचायत सभागृहात मतमोजणी झाली.
मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री कांबळे यांना १२५ मते पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोनाली योगेश वाघमारे यांना ७७ तर अपक्ष उमेदवार कुसुम श्रीपती सुरवसे यांना ५४ व अपक्ष उमेदवार प्रभावती उमाकांत सगट यांना २० मते पडली़ नोटाला दोन मते पडली आहेत. यात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री कांबळे या ४८ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी जाहीर केले. याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी काम पाहिले़
निकालानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिषबाजी करीत जल्लोष केला़ विजयी उमेदवार जयश्री कांबळे यांचा सत्कार केला़ यावेळी तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, नगरसेवक आरीफ खानापुरे, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान, काँग्रेसचे शहराध्यक्ष के.डी. पाटील, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरी लोखंडे, रहेमान मुल्ला, जुनेद खानापुरे, अरीफ हेड्डे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक सर्जेराव भंडारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.